उमेद अंतर्गत १०२ गावांत मत्स्यशेती

उमेद अभियान चंद्रपूर
0

चंद्रपूर : शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून अभियानाच्या वतीने मत्स्य व्यवसायास मोठी चालना दिली जात आहे. यावर्षी जिल्ह्यामध्ये उमेद अभियानाअंतर्गत एकूण ११ तालुक्यामध्ये १०२ गावातील २९१ स्वयंसहायता समूहातील ७४८ महिला मत्स्यशेती करीत आहेत. यात सातत्याने वाढ होत आहे.

अभियानाअंतर्गत गावपातळीवर वेळोवेळी मत्स्यशेतीचे तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी १०२ मत्स्यसखी कार्यरत आहेत. अभियाना अंतर्गत गावपातळीवर मत्स्यसखीना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी समुदाय मत्स्य व्यवस्थापक  कार्यरत आहेत. उमेद अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहायता समूहातील मत्स्यशेती करणाèया महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल ठरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चार प्रकारचे मासे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते. यात कटला, रोहू, मृगल, सायप्रनस या माश्यांचा समावेश आहे. तलाव साधारणत: वीस गुंठेपासून पुढे कितीही जागेत करता येतो. यापेक्षा मोठा करता येईल. मात्र, उत्पादनाचा खर्च खूप जास्त होतो. तलावाला एका जागी उतार असावा. यामुळे पाणी बदलण्यास आणि उत्पादन बाहेर काढण्यास मदत होते. तलावाच्या तळाशी चिकण मातीचा लेप लावावा. पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यातील क्षाराचे प्रमाण पाहून शास्त्रीय परीक्षणानंतरच जागेची निवड करावी. तलावाची रचना, माती, सामू, पाणी, क्षार अशा तांत्रिक गोष्टींसाठी समुदाय मत्स्य व्यवस्थापक मदत करतात.

या व्यवसायाकरिता लागणारे भांडवल महिलांना स्वयंसहाय्यता समूह, ग्रामसंघ, बँक कर्ज अशा विविध माध्यमांतून सहज उपलब्ध होते. अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेले ग्रामसंघ तसेच प्रोड्युसर ग्रुप सुद्धा सामुहिक तत्त्वावर मत्स्यशेती करत आहेत. महिलांना प्रशिक्षण देणे, मोठ्या संख्येने शेततळे निर्माण करण्यास प्रोत्साहित करणे, स्वच्छता उत्तम साठवणूक, बाजार उपलब्धता तसेच उत्पादित मालाला चांगला भाव आदीबाबत वेळोवेळी महिलांची क्षमतावृध्दी करण्यात येत आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos