चंद्रपूर : ग्रामसभा सुरू झाली. सरपंच आणि पदाधिकारी विराजमान झाले. ठरल्यानुसार काही मंडळींनी विकासाच्या मुदयांवर सरपंचाना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न सुरू केला. वातावरण तापले. सरपचांना पुरते कोडींत पकडल्याच्या आनंदात कुणीतरी 'महिलांना काय कळतं' या आशयाची शेरेबाजी केली आणि ग्रामसभेचा नूर पालटला. आतापर्यंत बघ्याच्या भूमिकेत असलेल्या सर्व महिला अचानकपणे आक्रमक होत सरपंचपदी असलेल्या 'रागिनी' च्या बाजूने उभ्या राहिल्या. रागिनीने हा विश्वास सार्थकी लावला. आता गावांत शंभर टक्के शौचालय, घरकुल, पिण्याचे पाणी, तर मुलांसाठी डिजीटल शाळा आणि विज्ञान कक्ष आहेत.
या सामाजिक बदलाची सुरूवात मात्र, खडतर प्रवासाने झाली. चंद्रपूर जिल्हयातील चिमूर तालुक्यातील लोहारा या गावची रागिनी सोनवणे 20 वर्षांच्या वयात सुन म्हणून या गावात आली. सासरी आल्यानंतर लागलीच तिला पतीच्या व्यसनाच्या समस्येला सामोरे जावे लागले. व्यसनातून कर्जबाजारीपणा तिने अनुभवला. सासरकडे 10 एकर शेती होती. मात्र, फारसे उत्पन्न होत नव्हते. कसेबसे जीवन कंठित असताना पतीच्या आग्रहामुळे ती ग्रामपंचायत निवडणूकीत उभी राहिली. कष्टाळूपणा आणि गावांत चांगले संबंध असल्याने महिलांनी तिला भरभरुन मतदान केले. ती सर्वांधिक मताने निवडून आली. आश्चर्य म्हणजे मनात काहीही नसताना रागिणीच्या गळयात सरपंचपदाची माळ पडली. मात्र, घरातील समस्येचा गुंता सुटला नव्हता.
यादरम्यान 2016 मध्ये उमेद अभियानाच्या वतीने भाग्यश्री महिला बचतगटाची स्थापना करण्यात आली. रागिनी सोनवणे या गटासोबत जुळल्या. गटासोबत जुळल्यानंतर खऱ्या अर्थाने तिची घुसमट कमी झाली. पतीच्या कर्जबाजारीपणामुळे इतर ठिकाणांहून कर्ज मिळत नव्हते. गटामुळे तिची ही अडचण दूर झाली. गरज पडेल, तेव्हा ती शेतीसाठी गटांमधून कर्ज घेवू लागली. ती बऱ्यापैकी सावरली.
यातून प्रपंचाचा गाडा ओढत असताना पती प्रशांतला असाध्य असा कॅन्सर असल्याचे लक्षात आले. उपचारासाठी कर्जाचा डोंगर उभा राहिला. मात्र, पती प्रशांतचे प्राण वाचू शकले नाही. 2018 मध्ये पती वारले आणि रागिणीच्या संघर्षाला नव्याने सुरूवात झाली. 7 वर्षाचा आदर्श आणि 10 वर्षाचा आदित्य नावाचे गोंडस नांतवडं असताना सासरकडील मंडळीस मायेचा पाझर फुटला नाही. एकीकडे रागिणी घरातील मंडळीसोबत असहकाराचा सामना करीत असतानाच बाहेरील मंडळी सुमारे 3 लाखाच्या कर्ज परतफेडीसाठी रागिणीला मेटाकूटीस आणत होते.
या स्थितीत स्वयंसहायता समुहांच्या महिला रागिणीसोबत खंबीरपणे सोबत राहिल्या. दैनदिन मदतीसोबत गटांकडून देण्यात येणाऱ्या कर्जात रागिणीला प्राधान्य देण्यात आले. पशूसखीच्या निवडीत तिला संधी देण्यात आली. तिची ही धडपड पाहून गावकऱ्यांनी मध्यस्थी करुन सासरकडील 10 एकरांपैकी अडीच एकर जमीन कसण्यास मिळवून दिली. रागिणीने संधीचे सोने केले. एक लाख कर्ज घेवून तीने तीन पिके घेवून पहिल्याच वेळी 3 लाखांचे उत्पन्न मिळविले. लोकांचे कर्ज फेडले. सासरकडील मंडळीचा असहकार न संपल्याने तिला घराच्या बाहेर पडावे लागले. काही दिवसांतच शासकिय घरकुल मिळवून तिने आपल्या दोन मुलांसह प्रपंच थाटला.
हा सर्व आटापिटा सुरू असताना ती समर्थपणे सरपंचपदाचा भार पेलत होती. सुरूवातीला काही करता आले नाही. मात्र, उमेद अभियानासोबत जुळल्यानंतर अनेक योजनांची माहिती मिळण्यास सुरूवात झाली. या योजना महिलांपर्यंत पोचविण्यासाठी तिचा प्रयत्न सुरू झाला. दारुबंदी आणि तंटामुक्तीस प्रथम प्राधान्य दिले. स्वयंसहायता समुहांतील महिलांनी तिला भरभरुन सहकार्य केले. शंभर टक्के शौचालयाचा विषय मार्गी लावल्यानंतर रागिणीने प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न पुर्ण केले. सुरूवातीला पुरूष मंडळींची असलेली कुरबुर महिलाशक्तीमुळे मागे पडली. महिला सरपंचाला विरोध म्हणजे सर्व महिलांना विरोध असे गावांत समिकरण तयार झाले. ग्रामसभेत न जाणाऱ्या महिला ग्रामसभेत उपस्थित नव्हे, तर विषय मांडू लागल्या. रागिणी आता कुठल्याही अधिकाऱ्यांसमोर गावांचा विषय समर्थपणे मांडू शकते. त्यातले बारकावे सांगू शकते. प्रसंगी इतरांवर अवलंबून न राहता निर्णयही घेते.
एक सर्वसामान्य महिला ते गावाच्या विकासासाठी निर्णय घेणारी सरपंच हा प्रवास सांगतांना रागिणी म्हणते, 'माझ्या प्रवासात खरे माझे सहप्रवासी असेल तर स्वयंसहायता समुहाच्या महिला. स्वत:चा प्रपंच पुन्हा उभा करण्यासाठी महिलांनी कुटूंबासारखा आधार दिला, तर सरपंच पद सांभाळताना त्यांनी योग्य नागरिकांची भूमिका पार पाडली'.
मुले लहान असली, तरी त्यांना चांगले शिक्षण देण्याचा तीचा मनोदय आहे. उमेद अभियानामुळे निव्वळ आर्थिक अडचणी दूर झाल्या नाहीतर समर्थपणे जीवन जगण्याचा मार्ग गवसला. आता एकटे वाटत नाही. समुहच आपले कुटूंब असल्यासारखे वाटत असल्याच्या त्या सांगतात.
लेखन
गजानन ताजने
जिल्हा व्यवस्थापक : विपणन व ज्ञान व्यवस्थापन
जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, चंद्रपूर