राजूरा (संकलन : नरेंद्र दिगांबर नगराळे, राजूरा) : चंद्रपुर ते असिफाबाद मार्गावरुन वरुड रोड या गावापासून 3 किमी अंतरावरील साखरवाही हे 165 कुटुंब संख्येचे 659 लोकसंख्येचे गाव. गावातील परिस्थिती अत्यंत गरिबीची. गावातील तरुण मुले व माणसे बेरोजगाराच्या शोधात होते. गावात शेतमजुरीशिवाय इतर कोणतेही काम नसल्याने आणि तेही हवे तेव्हा काम मिळत नसल्याने गाव सोडून बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ही स्थिति बदलली पाहिजे, ही सुप्त भावना व तळमळ गावातील लोकांत होती. पण नेमके करावे काय, हा प्रश्न काही महिलांच्या मनात धुमसत होता. काही महिलांकडे थोडीफार शेती असल्याने शेती हंगामात पैशाची चणचण जाणवत होती. यावर उपाय म्हणजे गटाच्या संकल्पनेशी त्या परिचित असल्यामुळे, त्या माध्यमातून काही गोष्टी सोडविल्या जाऊ शकतात याविषयी त्यांची खात्री होती. त्यातील 4 अनुसूचित प्रवर्गातील, तर 4 अनुसूचित जमातीच्या तर 02 महिला इतर प्रवर्गातील अशा 10 महिलानी एकत्र येउन महिला समुह स्थापन करण्याचे ठरविले. सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल, या विश्वासाने एक जानेवारी 2014 ला बिरसा मुंडा महिला स्वयंसहायता गटाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर बँककर्ज घेऊन घरच्या शेती व्यवसायाला हातभार लावण्याचे काम या गटाच्या माध्यमातून होऊ शकले. त्यामुळे शेतीव्यवसाय सुधारला. घरच्या पुरुष मंडळीनांही गटाचे महत्व कळू लागले. पुर्वी कर्जासाठी दुसऱ्यापुढे हात पसरावे लागत होते. मात्र, हेच काम गटातून सहजपणे झाल्यामुळे त्यांचा उत्साह दुणावला. याउपरही गटातील सहभागी महिलाच्या कुटुंबाची उपजीविका बळकट करणे आव्हानात्मक होते.
अशा स्थितीत गावात उमेद अभियानाने ऑक्टोबर 2017 ला प्रवेश केला. त्यावेळी गट ही संकल्पना जरी गटातील महिलांना परिचित असली, तरी केवळ समुहाच्या माध्यमातून अनेक कल्पनांना नवा आकार देवू शकतो, याविषयी महिला अनभिज्ञ होत्या. अभियानाच्या प्रवेशानंतर दशसुत्रीच्या माध्यमातून गटाच्या अभियानास अनुसरून आठवडी बैठका होऊ लागल्या. गटात एकसूत्रता यायला सुरुवात झाली. गटाबाबतीत पूर्वाश्रमीच्या ज्या कल्पना होत्या त्यात बदल होऊ लागला.
वर्ष 2017 मध्ये गटाचे श्रेणीकरण झाले व गटाला 26-03-2017 ला खेळते भांडवल रुपये 15 हजार मिळा»Öê. गटाच्या बचतीमधून छोट्या गरजा गटातच पूर्ण होऊ लागल्या. त्यामुळे काही गरज पडल्यास गटाचा मोठा आसरा महिलाना वाटू लागला. काही प्रमाणात गरज भागत होती. अशातच पुन्हा गटाला 2017 मध्ये समूह गुंतवणूक निधीचे रुपये 60 हजार मिळाले. गटाला अभियानातून हवे ते पूरक सहकार्य मिळू लागल्यामुळे गट पूर्णपणे अभियानाशी बधीलकी स्वीकारून काम करू लागला. परंतु कौटुंबिक पातळीवर कुटुंबासाठी थेट रोजगाराचे साधने उपलब्ध नसल्याने त्यादृष्टीने काही करता येईल काय याचा विचार गटातील महिला करू लागल्या.
गटातील सौ.कुसुमबाई आईलवर यांचा मुलगा तीनचाकी ऑटो वाहनाचा परवाना घेऊन होता. पण पैशाअभावी त्याला काही सुचेना. गावातील एका सुविचारी व्यक्तीने त्याला याचा उपयोग करून घेण्याचा सल्ला दिला. ग्रामीण भागात तसेही प्रवासी वाहनाची गरज असते. हे हेरून कुसुमबाईने मुलासाठी काही तरी करून द्यायचे म्हणून कंबर कसली आणि मुलाला तीनचाकी ऑटो घेण्याचे ठरविले. पूर्ण रक्कम एकमुश्त भरू शकत नसल्याने बँक कर्जद्वारे ऑटो घेण्यासाठी प्राथमिक रक्कम जमा करने गरजेचे होते. त्यासाठी सुद्धा रक्कम नव्हती. ती रक्कम भरण्यास गटाचे सहकार्य मिळाले आणि कुसुमबाईच्या मुलाला या स्वरोजगाराच्या माध्यमातून जगण्याचा एक नवा आधार मिळाला.
गटातील दुसऱ्या महिला सदस्य सौ. सुनीता आइलवार यांनी कुटूंबाला हातभार लावण्यासाठी गावात किराणा दुकानाची गरज ओळखून गटातून रकमेची मागणी केली .तसेच गटातील अनीता यादव रासेकर यांनी त्यांचे शेती या त्यांच्या प्रमुख व्यवसायात बियाणे व शेती सुधारण करण्यासाठी शेतजमिनीचा खालावलेला पोत सुधारून अधिक उत्पादन होण्याचे दृष्टीने शेणखताचा वापर शेतात करावयाची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी गटाकडे पैशाची मागणी केली. गावात आरोग्याचा व स्वच्छतेचा प्रश्न वारंवार उचलल्या जायचा. अभियानातून सुद्धा याबाबत सूचना देऊन शौचालय बांधून घेण्याबाबत आग्रह व्हायचा. हि गोष्ट व कुटुंबाची याबाबत गरज पाहून गटातील सौ. मीराबाई कवडू मडावी यांनी शौचालय बांधणीचा विचार मनात आणला. पण त्यासाठी त्यांचेकडे आवश्यक तो निधी उपलब्ध नव्हता. यासाठी पंचायत समिती राजुरा मार्फत स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे ठरविले. पण हा निधी अपुरा होत असल्याने त्यांनी गटातून सहकार्याची अपेक्षा केली. गटातील महिलांनी हि काळाची गरज ओळखून मीराबाईला पूर्ण सहकार्य केले आणि आपले शौचालय बांधणीचे काम पूर्ण करून घेतले व कशाही परिस्थितीत आरोग्याशी तडजोड करणार नाही हा संदेश इतर महिलांना व गावकऱ्यांना करून दिला. गटातील सौ. द्रोपदा आईलवार यांचे पडके घर असल्यामुळे त्यांनी घर दुरुस्तीकरिता गटातून काही रकमेची मागणी केली. त्यांचेबाबत परिस्थितीबाबत गटातील महिलांना जाणीव होतीच. त्यांची गरज ओळखून गटाने त्यांना तत्काळ दुरुस्तीसाठी 20 हजाराचे कर्ज उपलब्ध करून दिले.
अशाप्रकारे गट व गटातील महिलांना अभियानातून मिळालेले लाभ व त्यातून त्यांनी सावरलेले आपले संसार ह्यामुळे गावातील हा एक आदर्श गट बनला आहे.
नरेंद्र दिगांबर नगराळे
तालुका व्यवस्थापक (वित्तीय समावेशन)
उमेद, राजुरा