भद्रावती (संकलन : हर्षा उमरे, प्रभाग समन्वयक) : उमेद अभियानाकडून समुहांना प्राप्त होणाऱ्या समुदाय संसाधन निधीचा योग्य असा वापर करत आष्टा येथील दुर्गा कारमेघ यांनी व्यवसाय उभा केला आहे. या व्यवसायातून महिन्याकाठी 10 ते 12 हजार रुपये ती नफा मिळवित असल्याने तिला या व्यवसायाच्या रुपाने शाश्वत उपजिविकेचे साधन गवसले आहे.
भद्रावती तालुक्यातील आष्टा हे सधन गाव असून, शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. गाव ताडोबा अभयारण्याच्या शेजारी असल्याने नागरीक व वन्यप्राणी असा संघर्ष नेहमी सुरू असतो. याचा परिणाम शेतीवर दिसू लागला आहे. अशा या गावात दुर्गाच्या रूपाने स्वयंसहायता समुहाच्या महिलांना नवप्रेरणा मिळत आहे. उमेद अभियानाची कास धरून दुर्गा अरविंद कारमेघ या सर्वसाधारण कुटुंबातील युवतीने दिनांक 10/02/2017 रोजी जयज्योती स्वयंसहायता समूहाची स्थापना केली. समूहाला प्राप्त झालेला फिरता निधी व समुदाय गुंतवणूक निधी तसेच बँक कर्ज याद्वारे प्राप्त झालेल्या रक्कमेतून दुर्गाने व्यवसाय सुरू केला. या पैशातून दुर्गाने एका वर्षाआधी पिको फॉल मशीन व महिलांचे दैनंदिन साहित्य विक्री हा व्यवसाय सुरू केला. अल्पावधीतच दुर्गाने दोन शिलाई मशीन खरेदी केल्या. यासोबतच महिलांचे व लहान मुलामुलींचे रेडिमेड कापड दुकान सुरू केले. व्यवसायाला प्रतिसाद मिळू लागल्यानंतर आर्टिफिशिअल ज्वेलरी विक्रीचे कामही सुरू केले. या व्यवसायातून दुर्गाला 10 ते 15 हजार रुपये महिन्याकाठी नफा प्राप्त होत आहे. दुर्गाच्या हातात कला असल्यामुळे तिच्याकडून वेगवेगळया डिजाईनचे कपडे शिवून घेण्यावर महिला व मुलींचा कल आहे. याकरिता लागणारे लटकण, गोंदे, बटन्स, लेस इत्यादी किरकोळ साहित्य ती स्वत: निवड करून खरेदी करीत असल्यामुळे तिच्याकडील मालाला व कपड्यांना चांगली मागणी आहे. घेतलेल्या कर्जातील 60,000/- रुपये परतफेड केले आहे. दिवाळीत तिने स्वत:कडील 35,000/- रु गुंतवणूक करून केवळ एका महिन्यामध्ये 28,000/ रुपये निव्वळ नफा प्राप्त केला. गावातच उत्तम प्रकारची सेवा व कपडे मिळत असल्यामुळे लग्न समारंभ, पाहुण्यांचे देणे-घेणे याकरिता महिला उधारीवर देखील दुर्गाकडून खरेदी करतात.
दुर्गाचे शिक्षण पदवीपर्यंत झालेले असून, सामान्य व्यवसायाला वेगळे स्वरूप देऊन आपल्या सोबतच इतर 3 महिलांना व्यवसाय देऊन त्यांचादेखील आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. दुर्गाने अभियांनांतर्गत ऑगस्ट 2019 मध्ये मुंबई सरस मार्ट येथे सहभागी होऊन 7 दिवसात 9000/- रु मालाची विक्री केली. तिची प्रेरणा घेऊन गावातील महिलांनी महिलाशक्ती ग्रामसंघ स्थापन केला आहे. ग्रामसंघामार्फत अन्नसुरक्षा उपक्रम नुकताच राबविण्यात आला आहे. गावात 40 समूह स्थापन झाले असून, दूसरा ग्रामसंघ स्थापन होणार आहे. DDUGKY व RSETI अंतर्गत 4 मुला-मुलींनी आपले कौशल्य वृद्धिंगत करून रोजगार प्राप्त केला आहे. गावात दूरदर्शनवरील सह्याद्री वाहिनीवर प्रसारीत होणारी ग्रामीण जीवनावर आधारित “चावडी “ या मालिकेचे चित्रीकरण देखील झाले आहे. त्यात महिलांनी उमेद अभियानाचा आवर्जून उल्लेख केला. हा सर्व बदल उमेद अभियानाने झाला असे दुर्गा मनापासून सांगते. खऱ्या अर्थाने दुर्गा गावाकरीता नवज्योती ठरली आहे.
संपादन : गजानन ताजने
जिल्हा व्यवस्थापक : ज्ञान व्यवस्थापन व विपणन
nice work tai
ReplyDeletegood
ReplyDelete