ग्रामसंघाची लिपिका झाली उदयोजिका !

उमेद अभियान चंद्रपूर
0

भद्रावती (संकलन : रवी रघाताटे, तालुका व्यवस्थापक) - वर्षभरापुर्वी चूल आणि मूल या चाकोरीत अडकलेली रंजना घनश्याम नागपुरे स्वयंसहायता समुहाच्या माध्यमातून उदयोजिका झाली आहे. पिठाच्या गिरणीपासून तिने सुरूवात करुन नंतर शिवणकाम व आता ती कापड व्यवसायाकडे वळलेली आहे

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुका हा खनिज संपत्तीने व्यापलेला जिल्हा आहे. लागूनच ताडोबा हे प्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे. भद्रावती शहरापासून ८ किलोमीटर दूरवर चालबर्डी नावाचे गाव आहे. या गावची एकूण लोकसंख्या ९४७ असून, कुटुंब संख्या २२६ इतकी आहे. गावालगताचा पूर्ण परिसर शेतीने व्यापलेला असून, गावाचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. अशा या गावात २०१८ पासून उमेद अभियानाची सुरुवात झाली. अभियानाच्या वर्धिनी फेरीदरम्यान ८ गटांची स्थापना करण्यात आली. आज या गावात एकुण १७ स्वयंसहाय्यता समूह आहे. जिजाऊ ग्रामसंघाची स्थापनासुदधा करण्यात आली आहे. या ग्रामसंघाची लिपिका रंजना घनश्याम नागपुरे हिने अभियानाच्या माध्यमातून उपजिविकेचे वेगवेगळी साधने शोधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रंजनाताई हिला २ मुली व १ मुलगा आहे. मुले, पती व सासरे असा तिचा परिवार आहे. तिच्याबद्दल सांगताना तिचे सासरे म्हणतात कि “आमची पोरगी (सुनेला उच्चारून) कधीच घराबाहेर पडली नाही. ती शेती, घर आणि आपला यातच यातच गुंतलेली असायची. मनमिळाऊ, सगळयांना सांभाळणारी अशी आहे. ” रंजनाताई सांगतात “गटात येण्यापूर्वी मी शेती व घर एवढेच काम करीत होती. मला तहसील, पंचायत समिती ही कार्यालये सुदधा माहीत नव्हती. बँकेत मी कधी गेलीच नव्हती. पण उमेद अभियानाने माझ्यात इतका आत्मविश्वास निर्माण केला आहे कि, मी आता आपल्या पायावर उभी झाली आहे. यात माझ्या घरच्यांची पूर्ण सोबत दिली.”

रंजनाताईने गावातील गरज ओळखून आपल्या घरीच पीठगिरणी या व्यवसायाची सुरुवात करण्याचा निश्चय केला व याकरिता तिने गटातून २०,०००/- व ग्रामसंघातून ५०००/- व घोडपेठ येथील मध्यवर्ती बँकेकडून ५०,०००/- इतके कर्ज काढून व्यवसायास सुरुवात केली. या व्यवसायाला आज ६ महिने पूर्ण झाले आहेत. तिने गटाचे व ग्रामसंघाच्या कर्जाची पूर्ण रक्कम व्याजासहित परत केली आहे. बँकेचे पैसे दिलेल्या हप्त्यात परत करीत आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रंजनाताईची परतफेड नियमित असून, ति पुन्हा एकदा कर्ज घेवू शकते. सुरूवातीला पिठगिरणीपासून सुरूवात करणाऱ्या रंजनाताईने काही दिवसांपुर्वीच शिवणकाम व कापड विक्री व्यवसाय सुरू केला आहे.

आपल्या स्वयंसमुहानेही उपक्रमशील राहावे, यासाठी तीने पुढाकार घेतला. तिने गटाला एकत्रित आणून वृक्ष रोपवाटिका असा नवउपक्रम सुरु केला आहे. याच उपक्रमाची दखल घेवून हिरकणी नवउद्योजिका पुरस्कारासाठी तिच्या समुहाची निवड झाली.

तिच्या या उद़यमशिलतेमुळे तिच गावात वेगळी ओळख निर्माण झाली असून, इतर महिलांसाठी तिचा प्रवास प्रेरणा देणारा ठरत आहे.

(संपादन : गजानन ताजने, जिव्य. चंद्रपूर)

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos