चंद्रपूर : कृषि विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादीत वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीचे आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी विदयुत वरखेडकर, प्रकल्प संचालक तथा सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वर्षा गौरकार, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. दोडके यावेळी प्रामुख्याने हजर होते. महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादीत वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीचे दिनांक ०८ ऑगस्ट २०२२ पासून जिल्हा परिषद परिसरात नियोजन करण्यात आले होते. मात्र, मुसळधार पावसामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आज या प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. अगदी पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शविली. प्रदर्शनीमध्ये सर्वंच तालुक्यांतील समुहांनी आपला सहभाग नोंदविला. यात माध्यमातून आज विविध प्रकारचे उत्पादने विक्रीस होती. विविध प्रकारचे लोणचे, विविध प्रकारच्या चटण्या, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, खाद्यपदार्थ, पुरणपोळी, झुनका भाकर, जवस चटण्या, मातीचे भांडे, लोकरी वस्तू, लाकडी शिल्प, शोभीवंत वस्तू, हातसळीचे तांदूळ, कापडी बॅग, मशरुम, टेराकोटा, गांडूळखत, गोमुत्र अर्क आज विक्रीस ठेवण्यात आले होते.
दरम्यान आज अनेक प्रशासकिय अधिकारी यांनी भेटी देवून महिलांचा उत्साह वाढविला. पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, आयुक्त महानगरपालिका राजेश मोहिते आदींनी भेटी दिल्या. महोत्सव दिनांक 12 ऑगस्टपर्यत सुरु राहणार आहे. महोत्सवाच्या आयोजनासाठी उमेद अभियानाची तसेच कृषी विभागाच्या चमूने सहकार्य केले.