मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांचे खरेदीदार-विक्रेता संमेलनात आवाहन
चंद्रपूर, दिनांक 19 : उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात उत्पादकांचे जाळे निर्माण झाले असून, सामाजिक बांधिलकीतून व्यापाऱ्यांनी बाजारपेठ उपलब्ध करुन दयावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे. ते दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने एनडी हॉटेल येथे खरेदीदार-विक्रेता संमेलनात (Buyer-seller Meet) बोलत होते.
या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक डॉ. सुभाष पवार, जिअव्य मनोहर वाकडे यांची उपस्थिती हेाती. स्वयंसहायता समुहांच्या एकुण 35 उत्पादनांबाबत नामांकित हॉटेल व्यावसायिक, धान्य व्यापारी, शेतकरी कंपनी संचालक यांनी खरेदी स्वारस्य दाखविले.
उमेद अभियानाच्या वतीने जिल्हयात सुमारे 20 हजार समुह स्थापन करण्यात आले आहेत. याशिवाय 750 उत्पादक संघ आणि 10 महिला शेतकरी कंपनी कार्यरत आहे. या माध्यमातून विविध प्रकारच्या धान्याचे उत्पादन, संकलन होते. या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि पुरवठा साखळी निर्माण व्हावी, यासाठी पहिल्यादांच खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात शहरातील नामांकित हॉटेल व्यावसायिक, धान्य खरेदी व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक सहभागी झाले होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी समुहांच्या उत्पादनांना सामाजिक बांधिलकीतून बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास समोर यावे, असे आवाहन केले. खरेदीदारांच्या गरजेनुसार दर्जा, पॅकिंग उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांनी उमेद अभियानाचे जाळे भक्कम असल्याने उत्पादनांची पुरवठा साखळी उभी करण्यास खरेदीदार यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. जिल्हा व्यवस्थापक-विपणन यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून निर्माण होत असलेल्या उदयोगसंधी यावर सादरीकरण केले. यशवंत सायरे यांनी शेतकरी कंपनीस असलेल्या संधीबाबत माहिती दिली.
संचालन बंडू लेनगुरे, तर आभार जिल्हा व्यवस्थापक प्रवीण भांडारकर यांनी मानले. खरेदीदार समन्वयासाठी अभियानाचे व्यवस्थापक श्री. मोहित नैताम,विवेक नागरे, नितीन वाघमारे, राजेश दुधे, संदीप घोंगे, रोशन साखरे यांनी सहकार्य केले.