लक्षणीय विक्रीमुळे महिला उत्पादक सुखावल्या
चंद्रपूर : कृषि विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादीत वस्तुंचे विक्री प्रदर्शनात मागील तीन दिवसांत सुमारे 3.5 लक्ष रुपयांच्या उत्पादनांची विक्री झाली. आज या प्रदर्शनाचा सहभागी समुहांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
दिनांक 10 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय प्रदर्शनीस जिल्हा परिषदेच्या आवारात सुरूवात झाली. सलग 3 दिवस चाललेल्या प्रदर्शनास चंद्रपूरकरांना मोठा प्रतिसाद दिला. प्रदर्शनात महिलांनी उत्पादीत केलेल्या विविध उत्पादनांचा समावेश होता. प्रदर्शनादरम्यान जिल्हयातील अनेक मान्यवरांनी भेटी देवून महिलांचा उत्साह वाढविला. सोबत जेवणाच्या विविध ग्रामीण खादपदार्थही विक्रीस उपलब्ध होते. विविध प्रकारचे लोणचे, चटण्या, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, लोकरी वस्तू, लाकडी शिल्प, शोभीवंत वस्तू, हातसडीचे तांदूळ, कापडी बॅग आदीची मोठया प्रमाणात विक्री झाली.
मागील 3 दिवसांत एकुण 3.5 लक्ष रुपयांची विक्री झाली. मागील दोन वर्षांच्या कोरोना महामारीमुळे जिल्हास्तरावर कुठलेही प्रदर्शन होवू शकले नव्हते. त्यामुळे यावेळच्या प्रदर्शनामुळे महिलांचा उत्पादन विक्रीसाठी चांगले व्यासपिठ उपलब्ध झाले होते. आज जिल्हा परिषदेचे विभागप्रमुखांनी विविध तालुका कक्षांच्या उत्पादनांना भेटी देवून विविध मागर्दशनपर सुचना केल्यात.
प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांसह उमेद अभियानाच्या तालुका अभियान व्यवस्थापन कक्षांनी सहकार्य केले.