सावली : उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, सावली अंतर्गत ग्राम पंचायत, उपरी येथे उमेद अभियानाच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीशक्ती महिला स्वयं सहाय्यता समूहाची स्थापना करण्यात आली. सदर समूहाने सन २०१९-२० मध्ये राणी हिरकणी नव उद्योजक महाराष्ट्राची या स्पर्धेत सहभाग घेऊन ५० हजार रुपयाचे बक्षीस प्राप्त करून शेणापासून विविध कलाकृती व देखणी वस्तूची निर्मिती करून व्यवसायाची सुरवात केली आहे. याकरिता सदर गटाने ३५ हजार रुपये किमतीचे मशिन अहमदाबाद गुजरात येथून खरेदी करून नावीन्यपूर्ण व्यवसायामध्ये शेणापासून कुंडी, मूर्ती, तोरण, दिवे तयार करून बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध केले.
एकीकडे कोरोना महामारीमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असतानाच समुहाच्या महिलांनी खंबीरपणे परिस्थितीशी लढत अभियानाच्या साहाय्याने प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्या स्वयंरोजगार करू लागल्या आहेत. यामुळे सदर गटाला रोजगार प्राप्त होऊन आर्थिक उत्पन्न मिळू लागले असून, या नावीन्यपूर्ण व्यवसायाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.