सिंदेवाही : कोरोनाच्या काळात व्यवसाय टप्पा पडल्यामूळे ब-याच कुंटुंबांवर बेरोजगारीचे संकट आले. मात्र, वैष्णवी समुहातील महिलांनी राखी विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबांना हातभार लावला.
राखी हा बहीण भावाच्या नात्यातील सलोख्याचा सण म्हणून ओळखला जातो. मात्र, यावेळी महिलांना बाजारात जाऊन राखी खरेदी करण्याकरिता कोरोनामुळे मुभा नव्हती. अशावेळी उमेदच्या नवरगांव येथील वैष्णवी समुहातील सौ.सुलोचना निमजे व सौ.वर्षा पराते यांनी राखीला लागणारा कच्चा माल नागपूर व सिंदेवाही येथूनच खरेदी केला. त्यांनी कुटुंबाच्या मदतीने उत्कृष्ट अशा राख्या तयार केल्या. त्याची पॅकिग करून नवरगांव, मिनघरी, रत्नापूर या गावांमध्ये गटातील महिलांना घरोघरी भेटी देऊन राख्या विक्री केल्या. यामध्ये १५ हजारांच्या राख्या तीन दिवसात विक्री करण्यात आल्या.
हा व्यवसाय त्यांनी मागिल वर्षापासून सुरू केला असून, या वर्षात आवश्यक तेवढा कच्चा माल उपलब्ध न झाल्यामुळे व्यवसाय मागील वर्षाचा तुलनेत कमी राहिला. तरीपण त्यांचा उत्साह कुठेही कमी पडला नाही. या व्यवसायाकरिता सिंदेवाही तालुक्यातील उमेद चमूने सहकार्य केले.