कोरपना : कोरोना कालावधीत अनेक छोटे उद्योग बंद झाल्याने आर्थिक देवघेवीवर परिणाम झाला. या स्थितीत खरिपासाठी मोठया प्रमाणात आणि आतापर्यंत सर्वाधिक कर्जप्रस्ताव सादर करून कोरपना तालुक्यातील उमेद चमूने कौतुकास्पद कार्य केले आहे.
कोरोनामुळे पैशाचे परंपरागत मार्ग बंद झाल्याने तसेच शेतीशिवाय दुसरा पर्याय न राहिल्याने स्वयंसहायता समुहांकडून कर्जासाठी मोठी विचारणा होऊ लागली. या स्थितीत उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाने नियोजन करून मोठया प्रमाणात कर्जप्रस्ताव तयार केलेत. हंगामाची वाट न पाहता एप्रिल ते मे या महिन्यांतच विविध स्तरावर जागृती करण्यात आली. प्रभाग समन्वयक, समुदाय व्यवस्थापक, बँकसखी यांच्या माध्यमातून अनेक गावांत पोचून कक्षाने प्रस्ताव तयार केलेत. या कामात बँकांनीही सकारात्मक योगदान दिले.
आजमितीस १४ कोटी १२ लाख ९१ हजार रक्कमेचे ७३१ प्रस्ताव बँकेला सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ३७० समूहांना एकूण ७ कोटी १८ लाख ८० हजार रकमेचे प्रस्ताव मंजूर व वाटप करण्यात आलेले आहेत. या कर्जाच्या माध्यमातून शेतीसोबतच सामुहिक खत खरेदी, सामुहिक बियाणे खरेदी, विविध जैविक औषधी करण्यात आली.
तालुक्यात प्रथमच इतक्या मोठया प्रमाणात स्वयंसहायता समुहांकडून कर्जप्रस्ताव सादर करण्यात येऊन वितरण करण्यात आले.