विविध व्यवसायातून ग्रामसंघ 'प्रगती'कडे

उमेद अभियान चंद्रपूर
0
भद्रावती (संकलन : हर्षा उमरे, प्रभाग समन्वयक) : तालुक्यापासून 40 किलोमिटर अंतरावर टेकाडी हे गाव आहे. जेमतेम 150 घरांची वस्ती असलेले या छोट्याश्या गावात सर्वांची शेती महाऔष्णिक विज प्रकल्पात गेल्यामुळे शेती आधारित कुटुंब कमी असून, मजुरी करणाऱ्या कुटुंबाची संख्या जास्त आहे. अशा या गावात 140 महिलांचे 13 स्वयंसहाय्यता समूह कार्यरत आहेत. सर्व समुहांनी उमेद अभियानाची कास धरून दोन वर्षापूर्वी प्रगती ग्रामसंघ स्थापन केला. नावाप्रमाणे ग्रामसंघाने प्रगतीकडे वाटचाल सुरू केलेली आहे.

ग्रामसंघाला जुळलेल्या सावित्री समूहाने सामूहिकरित्या स्वस्त धान्य दुकान व्यवसाय आणि आदिवासी शारदा समूहाने शेळीपालन व्यवसाय सुरू केलेला आहे. दोन्ही समुह यशस्वीपणे व्यवसायातून उत्तम नफा मिळवत असून ग्रामसंघातील इतर महिलांनी भरीस भर म्हणून ओम धान व्यवसाय समूह या उत्पादक संघाची स्थापना केली आहे. समुहामार्फत छोटी राईस मिल विकत घेऊन व्यवसाय सुरू केलेला आहे. 65 हजार रुपये किमतीची ही मशीन या समूहाने कृषि विभागाच्या आत्मा या योजने अंतर्गत प्राप्त केली आहे. यासाठी त्यांना शासनाकडून अनुदानही मिळाले आहे. संघातील महिलांना तांदूळ तयार करण्याचा व्यवसाय उभा करता आला आहे.

ग्रामसंघाला 3 लाख रुपये समूह गुंतवणूक निधी उमेद अभियानामार्फत देण्यात आला. या रकमेवर संघाला निव्वळ नफा 42 हजार 940 व्याजाचे स्वरुपात प्राप्त झालेले आहे. प्रगति ग्रामसंघातील सर्व13 समुहांच्या दशसूत्रीनुसार आठवडी बैठका होत असून संपूर्ण समुहांचे रेकॉर्ड अद्यावत आहेत . ग्रामसंघाने अन्न सुरक्षा निधि अंतर्गत सामूहिक किराणा खरेदी करून माफक दरात महिलांना उपल्ब्ध करून दिले आहे. यावर देखील त्यांना 3060/- रु बचत होऊन नफा प्राप्त झालेला आहे. 9 समुहानी 13 लाखाचे बँक कर्ज घेतलेले आहे. त्याची नियमित परतफेड सुरू आहे. अलिकडेचा ग्रामसंघाने सामूहिक शेळी पालन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशाप्रकारे प्रगती ग्रामसंघ नावाप्रमाणेच प्रगती साधत आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos