अन दुर्गम खेडयात उभी राहिले यशोधरा पोल्ट्री युनीट

उमेद अभियान चंद्रपूर
1
जिवती ( संकलन-मनोजकुमार मेश्राम) :
जिवती तालुक्यातील चिखली (बूज.) हे एक छोटसं गाव. गावात आदिवासीबांधव मोठया प्रमाणात राहतात. गावातील सर्व लोक शेती व्यवसाय करतात. उमेद अभियानाचा गावप्रवेश होण्यापुर्वी स्वयंसहायता समुहाबाबतही गावांत फारशी जागृती नव्हती. अभियानाने 2016 पासून गावांत समुह स्थापनेचे काम चालू केले. समुह स्थापन झाल्यावर गावांतील स्थिती लक्षात घेता मुख्य पाच सूत्रांवर भर देण्यात आला. महिला नियमितपणे बैठकी घेवू लागल्या, बचत करू लागल्या, छोटे मोठ्या कर्जाची अंतर्गत देवान घेवाण चालू झाली. यामुळे इतर महिला एकत्र येऊ लागल्या. आपसात बोलू लागल्या. उमेदमुळे पुन्हा एकदा महिलांत संवाद सुरू झाला. समुहाचे काम व्यवस्थीत सुरू झाल्यानंतर उपजीविका विषयावर अभियानाकडून भर दिला जावू लागला.
गटामध्ये अंतर्गत कर्ज घेऊन महिलांनी सुरुवातीस वैयक्तिक छोटे व्यवसाय चालू केलेत. यापैकी एका महिलेने सुरुवातीस चहाचे दुकान सुरू केले, तर दुसरीने भाजीपाल्याचे व्यवसाय चालू केला. इतर महिलांनीही आपापल्या परिने नवीन उदरनिर्वाहाचे साधने शोधण्याची खटपट सुरू केली. गावांत अनेक नवे गट सुरू झाल्याने सामुहिक व्यवसाय करावा, असा विचार समोर आला. अभियानाच्या वतीने या गावांत सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ 10 जून 2017 रोजी स्थापन करण्यात आला होता. 10 गट ग्रामसंघाशी जुळले होते. उमेद अभियानाच्या चमूने उपजिविकेचे अनेक उपक्रम सांगितले. यावर ग्रामसंघामध्ये चर्चा झाली. एखादा मोठा सामुहिक व्यवसाय करण्यावर सर्वांचे एकमत झाले. पैशाची उभारणी, कामाचे वाटप यावरही बरीच चर्चा झाली. चर्चेअंती कुक्कूटपालन करण्यावर ग्रामसंघाचे एकमत झाले.

हा विचार त्यांनी उमेद अभियानाच्या चमूसमोर मांडला. अभियानाकडून बैठका घेवून आवश्यक माहिती देण्यात आली. नियोजन करण्यात आले. व्यवसायातील धोका आणि भविष्यातील संधी, निधी उभारणीचे पर्याय सुचविण्यात आले. व्यवसाय ठरला. मात्र, जागेची अडचण उभी राहिली. यावर जागा भाडे तत्वावर घ्यायचे ठरले. काही पैसा बॅकेकडून उभा करायचा असे ठरले. कमी दिवसांमध्ये जास्त उत्पादन करण्याकरिता ग्रामसंघाच्या महिलांनी मदर पोल्ट्री फार्म टाकायचे ठरविले. छोटे पक्षी आणून त्यांना मोठे करायचे व ते 75 दिवसांनी विकायचे ,असे ठरले. यामुळे ग्रामसंघातील भांडवल वाढेल व महिलांना आर्थिक मदत जास्त प्रमाणात करता येईल, असा यामागचा उद्देश होता. विक्री कशी करायची यावर बरीच चर्चा झाली. सुरुवातीस गावांमधेच चिकनसेंटर सुरू करायचे व नजीकच्या गावातील चिकनसेंटरना कुक्कूट पुरवायचे असे ठरले.

एक एक दिवस करता करता शेड उभे राहिले. अनेक कामे श्रमदानातून करण्यात आली. हे सर्व करत असताना काहींना टिका केली तर काहींनी कौतुक केले. शेड उभे राहिले, विज आली आणि यशोगाथा मदर पौल्ट्री फॉर्म असे नामकरण झाले. व्यापारी प्रतिष्ठानाकडून छोटी पिल्लं विकत आणली गेली. या पिल्लांसाठी खास चारा आण्ण्यात आला. पशूसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना लसीकरणासाठी मदत करण्याची विनंती करण्यात आली. हळूहळू पिल्लं मोठी झाली आणि विक्री सुरू झाली. पुर्वी सहभागी न झालेल्या महिलां स्वत:हून सक्रिय झाल्या. पुरूष मंडळीही सहकार्य करु लागलेत. विक्रीतून जो नफा होत आहे, त्यातून आणखी व्यवसाय वाढविण्याचे महिलांचे नियोजन आहे.


संपादन
गजानन ताजने
जि.व्य. ज्ञान व्यवस्थापन व विपणन
उमेद, चंद्रपूर

Post a Comment

1Comments

  1. या माहितीप्रमाणे माझ्या ही प्रभागात असा व्यवसाय ग्राम संघ मार्फत उभा केला जात आहे.सद्यस्थितीत संघर्ष ग्रामसंघ आक्सापूर प्रभाग करंजी धांनापूर तालुका गोंडपिपरी मार्फत बांधकाम साहित्य व किराणा सामान व्यवसाय चालू केला आहे.

    ReplyDelete
Post a Comment
Videos Photos