चंद्रपूर (संकलन : राजेश धांदळे, क्षेत्रसमन्वयक ) : पर्यटनस्थळ असलेल्या मोहोर्ली येथे भेट देणाऱ्यांची संख्या बघून वंदनाताईने खाणावळीचा व्यवसाय सुरू केला. सुक्ष्म गुंतवणूक निधीच्या माध्यमातून त्यांनी हा व्यवसाय उभा केला असून, खर्च वजा जाता दहा ते 12 हजार रुपयांचे तिला उत्पन्न मिळत आहे.
चंद्रपूर वरुन 35 कि.मी.अंतरावर वसलेले मोहर्ली हे गाव ताडोबा अभयारण्याच्या पायथ्याशी वसलेले आहे.


गावामध्ये अभियानामार्फत मिळालेल्या निधीमधून अनेक समुह छोटे मोठे व्यवसाय करित आहेत. किराणा दुकान, चहा नास्ता सेंटर, जनरल स्टोअर्स, चिकन सेंटर, शिवणकाम, खाणावळ इत्यादी व्यवसाय महिला करत आहेत.
वंदनाताई यांच्या समुहाला अभियानांमार्फत खेळते भाडवल आणि सुक्ष्म गुंतवणूक निधी प्राप्त असून, या निधीमधुन त्यांनी नवीन व्यवसाय करण्याचे ठरविले. मोहर्ली -ब्रम्हपूरी मार्गाच्या कडेला त्यांनी स्वत:चे जनरल स्टोअर्स उभारले. हळूहळू त्यांच्या व्यवसायाला प्रतिसाद मिळू लागला. तालुका अभियान व्यवस्थापक कक्षाकडून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभत होते. मिळणाऱ्या मार्गदर्शनातून आणि स्वयंप्रेरणेतून त्यांनी नवीन व्यवसाय म्हणून खाणावळीचा व्यवसाय सूरु केला. यासाठी त्यांनी 30000 रुपयांचे कर्ज समुहाकडून घेतले. या पैशातून त्यांनी खाणावळीसाठी काही साहित्य घेतले तसेच काही रक्कम दैनदीन बाबीसाठी ठेवली. मोहर्ली गावामध्ये पर्यटनासाठी मोठ्या संख्येने निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालविण्यासाठी पर्यटक येतात व मुक्कामी राहतात. त्यामुळे वंदनाताईचा खाणावळीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यांचे मासिक उत्पन्नात वाढ होऊन त्याचा महिन्याचा निव्वळ नफा 10 ते 12 हजाराच्या जवळपास आहे. याचे सर्व श्रेय ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला देतात.
संपादन
गजानन ताजने
जिल्हा व्यवस्थापक : ज्ञान व्यवस्थापन
उमेद, चंद्रपूर