
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील शेणगाव हा गाव अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. जिवती तालुक्याची भौगोलिक स्थिती पाहता संपूर्ण तालुका हा डोंगररांगामध्ये वसलेला आहे. सतत असलेला पाण्याचा दुष्काळ, पिण्याच्या पाण्याची टंचाई, डोंगराळ शेती यामुळे या भागात शेती करणे इतर भागाच्या तुलनेत अंत्यंत आव्हानात्मक आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून 12 कि.मी. अंतरावर असलेला या गावात 515 कुटुंब असून, 2 हजार 630 लोकसंख्या आहे. या भागातील शेती ही डोंगर उताराची असल्यामुळे कितीही पाऊस पडला जमिनीत ओलाचा हा बेताचाच असतो. परिणामी बहुतेक कुटूंब आर्थिक अडचणीचा सामना करत असतात. त्यातल्या त्यात अनेकजण पारंपारिक पद्धतीनेच शेती करतात.

या माहितीमुळे प्रेरित होवून स्वयंसहायता समुहाची सदस्य रोहिणी रमाकांत माने हिने भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला. रोहिणी रमाकांत माने यांच्याकडे एकूण 12 एकर शेती आहे. शेतात विहीर असून 5 एकर शेती ओलीताखाली आहे. पण मार्गदर्शनाच्या अभावामुळे शेतीचे नियोजन होत नव्हते. त्यामुळे उत्पादन कमी होत होते. अनेकदा शेती करण्याकरिता खासगी व्यक्तींकडून कर्ज घ्यावे लागत होते.
रोहीणीताईने 2019 मध्ये 2 एकरात कोबीची लागवड केली. लागवडीच्य बहुतेक सेंद्रीय शेतीच्या कार्यपदधती वापरल्या. मात्र, पाऊस जास्त असल्यामुळे उत्पादन कमी झाले. तरीसुदधा सर्व खर्च काढता खरीपाचे उत्पादन रुपये 92 हजार झाले. त्यामुळे परिवारातील सर्व सदस्यांना भाजीपाला या नगदी पिकाबद्दल ओढ निर्माण झाली. सौ. रोहिणी यांच्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती असून पती-पत्नी, मुलगा-मुलगी व आई असा परिवार आहे. सर्व परिवार शेतामध्ये काम करून आपली उपजीविका करतात. यावर्षी भाजीपाला लागवडीमुळे सतत पैसे हातात खेळू लागला. कुणाकडूनही कर्ज घेण्याची गरज पडली नाही. कोबी उत्तम दर्जाची असल्यामुळे गावातील बाजारात मागणी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे यावर्षीपासून त्यांनी कामावर स्वतंत्र गडी पण ठेवला.
रब्बीकरिता कोबीचे दुसरे पीक घेण्याकरिता 2 एकर जमीन तयार करून नर्सरी तयार करण्यात आली आहे. त्यासोबत टोमॅटोचीपण लागवड केली. पारंपारीक पिके न घेता नगदी पिके घेतल्यास काय फायदा होतो, हे इतर महिलांसुदधा कळल्याने गटातील इतर महिला सुदधा भाजीपाला लागवडीकडे वळत आहेत.
संपादन : गजानन ताजने
जि.व्य.: ज्ञान व्यवस्थापन व विपणन,
उमेद, चंद्रपूर