नागभीड : तालुक्यातील वलनी येथे घरकूल मार्टचे उद्घाटन गुरूवारी पार पडले. या मार्टमधून घरकूल लाभार्थ्यांना माफक दरात घरकूल साहित्य उपलब्ध होणार आहे.
तालुका जीवन्नोत्ती अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती नागभीड व राणी हिराई शेतकरी उत्पादक कंपनी नागभीड यांच्या संयुक्त विद्यमाने हे घरकूल मार्ट सुरू करण्यात आले आहे. नागभीड तालुक्यातील ज्या घरकुलाच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधायचे असेल त्यांच्याकरिता कमी दरात घरकुल बांधकामाचे साहित्य शासनातर्फे या घरकुल मार्टमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे यांनी केले. अध्यक्षस्थानी सभापती प्रफुल खापर्डे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य खोजराम मरस्कोल्हे, पं. स. सदस्य सुषमा खामदेवे, पं. स. सदस्या रंजना पेंदाम, सरपंच अनिल बोरकर, तालुका अभियान समन्वयक मोहीत नैताम यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथींचे समयोचित मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे संचालन वर्षा लांजेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रूपाली कोसे यांनी केले.