चंद्रपूर : ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिनचा वापर वाढावा व आरोग्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित जागर अस्मितेचा या कार्यक्रमाचा शुभारंभ आज जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत आयोजित या मोहिमेची आजपासून जिल्हाभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आज गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी कन्नमवार सभागृहात आयोजित ‘जागर अस्मिते‘चा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, प्रकल्प संचालक शंकर किरवे, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने उपस्थित होते. महिलांच्या मासिक पाळी दरम्यान होणारे विविध आजार टाळण्यासाठी तसेच आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम अंतर्गत सवलतीच्या दरातील अस्मिता प्लस सॅनिटरी नॅपकिन स्वयंसहायता समूहामार्फत शाळकरी मुली तसेच महिलांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याप्रसंगी बोलताना जिप अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांनी ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिनचा वापर वाढावा व आरोग्य विषयक जागृती निर्माण व्हावी यासाठी उमेद अभियानाने सुरू केलेल्या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी असे मत व्यक्त केले. मुख्य कार्यपालन अधिकारी कर्डिले यांनीही या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिनचा वापर वाढेल व स्वयंसहायता समूहाच्या महिलांनाही अर्थार्जन होईल असा आशावाद व्यक्त केला. महिला बालकल्याण सभापती श्रीमती चौधरी यांनीही कोरोना काळात उमेद अभियानाने केलेल्या विविध कामाची स्तुती केली.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा व्यवस्थापक कृती संगम प्रवीण भांडारकर, प्रस्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने तर आभार तालुका अभियान व्यवस्थापक शीतल देरकर यांनी मानले. याप्रसंगी प्रतीकात्मक रित्या पाच महिलांना अस्मिता प्लस सॅनिटरी नॅपकिन वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा व्यवस्थापन कक्ष व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चंद्रपूर येथील जिल्हा व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक यांनी मोलाचे सहकार्य केले